मिशन सागर: मॉरीशस येथील पोर्ट लुईस येथे आयएनएस केसरी

नवी दिल्ली, दि. २४ मे २०२०: मिशन सागरचा एक भाग म्हणून, भारतीय नौदल जहाज केसरीने २३ मे २०२० रोजी पोर्ट लुईस मॉरिशसमध्ये प्रवेश केला. केंद्र सरकार कोविड -१९  महामारीचा सामना करण्यासाठी शेजारी मित्र देशांना मदत पुरवत आहे आणि या भारतीय नौदल जहाज केसरीने कोविड संबंधित आवश्यक औषधे आणि आयुर्वेदिक औषधांची एक खास खेप मॉरीशसच्या लोकांसाठी नेली आहे.

याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाचे डॉक्टर आणि निमवैद्यकीय यांचा समावेश असलेले १४-सदस्यांचे विशेष वैद्यकीय पथक देखील या जहाजातून पाठवण्यात आले असून ते मॉरीशसच्या डॉक्टरांबरोबर एकत्रितपणे कोविड संबंधित आपत्कालीन परिस्थितीत मदत करेल. वैद्यकीय साहाय्य पथकात एक कम्युनिटी वैद्यकीय तज्ञ, एक फुफ्फुसाच्या रोगावरील विशेषज्ञ आणि एनेस्थेसियोलॉजिस्ट यांचा  समावेश आहे.

२३ मे २०२० रोजी भारत सरकार कडून मॉरीशस सरकारकडे औषधे सुपूर्द करण्याचा अधिकृत समारंभ आयोजित करण्यात आला. आरोग्यमंत्री डॉ. कैलेश जगतपाल यांनी मॉरिशस सरकारच्या वतीने ही औषधे आणि अन्य सामुग्री स्वीकारली. भारताकडून मॉरिशसमधील भारताचे उच्चायुक्त तन्मय लाल यांनी प्रतिनिधित्व केले.जगतपाल यांनी या सोहळ्यादरम्यान  भारतीय नौदल जहाज केसरीचे कमांडिंग ऑफिसर कमांडर मुकेश तायल यांच्याशीही संवाद साधला.

मॉरिशसला दिलेली मदत ही सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संपर्क कार्यक्रमाचा एक भाग आहे. ‘मिशन सागर’ हे प्रांतातील सुरक्षा आणि विकास या दृष्टीने ‘सागर’या पंतप्रधानांच्या स्वप्नाशी सुसंगत आहे. आयओआरच्या देशांशी संबंधांना भारताने दिलेले महत्त्व या मिशनमध्ये ठळकपणे अधोरेखित करते आणि कोविड-१९ आजाराशी लढा देण्यासाठी दोन्ही देशांमधील उत्कृष्ट संबंधांवर आधारित  आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारच्या इतर संस्थांमधील समन्वयाच्या माध्यमातून हे अभियान राबवले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा