बीड, दि.२२ मे २०२०: नव्या शासकीय नोंदीसह कापूस, तूर, हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावेत, या मागणीसाठी गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी थेट उपोषणाचे अस्त्र उगारलं असून गुरुवारी (दि.२१) सकाळपासूनच तहसील कार्यालयासमोर तोंडाला मास्क बांधून उपोषणाला बसल्याने बीड जिल्हा प्रशासनाची त्रेधातिरपीट उडाली आहे.
शासकीय नव्या नोंदीसह कापूस, तुर व हरभरा केंद्र सुरू करण्यात यावे अशा आशयाची मागणी १४ मे रोजी आ.लक्ष्मण पवार यांची निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली होती. त्याबरोबर उपोषणाचा इशाराही दिला होता.
मात्र प्रशासनाने आ.पवारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. सध्या खरीप हंगाम काही दिवसावर येवून ठेपला असल्याने शेतकर्यांना बि-बियाणे खते, शेती उपयोगी अवजारे खरेदी करण्यासाठी पैशाची गरज असते.
शेतकर्यांच्या शेतातला कापूस तूर व हरभरा खरेदी केंद्रावर खरेदी केल्यास त्यांना योग्य भाव मिळेल. परंतू या खरेदी बंद आहेत. कापूस खरेदी ५० गाड्या केली जात नाही. याबाबत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आमदार लक्ष्मण पवार यांनी तहसील समोर उपोषण सुरू केलं आहे.
यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सभापती दिपक सुरवसे, उपसभापती संदिप लगड, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, ब्रह्मदेव धुरंधरे, विठ्ठल मोटे, संजय आंधळे, प्रा.येळापुरे, गोरख मोटे आदींची उपिस्थती होती. या सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळून उपोषण सुरू ठेवले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: