खुर्ची वाचवण्यासाठी आमदारांची पळापळ, राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाशी सर्वसामान्य जनतेला देणे घेणे नाही, छत्रपती संभाजीराजे यांचे विधान

नांदेड ११ मे २०२३ : सध्या सुरू असलेल्या राज्याच्या सत्ता संघर्ष प्रकरणी लागणाऱ्या निकालाशी सर्वसामान्य जनतेला काहीही घेणे देणे नाही. खुर्ची वाचावण्यासाठी आमदारांची पळापळ सुरु असल्याचे मत स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. राजकारणाचा असा पोरखेळ अनेक वर्षापासून चालला आहे.आता लोक त्याला कंटाळले असल्याचे विधान प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी केले.

राज्याच्या आज लागणाऱ्या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत सर्वसामान्यांना काही देणघेण नाही. सध्या राज्यात शेतकऱ्यांची आवस्था बिकट आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. आमचे एवढेच म्हणणे आहे की तुम्ही विकासावर बोला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना कशा आणणार आहेत यावर चर्चा करा. राजकारणात सध्या पोरखेळ सुरु आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत राहिला नसल्याचेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

राज्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सत्तासंघर्षाचा फैसला आज होणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज ११ मे रोजी दोन महत्वाच्या प्रकरणांवर घटनापीठ निकाल देणार असल्याचे सांगितले. त्यामुळं संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आजच्या या निकालाकडे लागले आहे. देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वात किचकट प्रकरण असलेल्या निकालाचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या पद्धतीने विश्लेषण करणार? याकडे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा