मुलींचे अंघोळ करतानाचे एमएमएस व्हायरल, आठ मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न, चंदीगड येथील घटना

चंदीगड, १८ सप्टेंबर २०२२ : चंदीगड येथील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून तरुणाला पाठवले. हेच व्हिडिओ तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे चंदीगड विद्यापीठात मोठा गोंधळ उडाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून हॉस्टेलमधील तरुणींचे व्हिडिओ बनवले जात होते. ही बाब समोर आल्यावर तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

येथील विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ८ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर येथील संतप्त विद्यार्थ्यांनी चंदीगड विद्यापीठाला घेराव घालून वुई फॉर जस्टिस असा नारा दिला. हे व्हिडिओ बनवणाऱ्या मुलीवर हल्ला होऊ नये म्हणून तिला हॉस्टेलच्या एका खोलीत बंद करून ठेवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

येथील गोंधळ मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यानंतर येथील सुरक्षा रक्षकाने मुख्य गेट बंद केले. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी पोलीस वाहनांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. प्रकरणाची तीव्रता वाढत असल्या मुळे पोलीस प्रशासनानेही काही बोलणे टाळले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर मुलींचे व्हिडिओ व्हायरल करणारा तरुण हा शिमला येथील रहिवासी आहे. याच हॉस्टेलमधील एक मुलगी त्याला मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढून पाठवत होती.

व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या युवकाने हे व्हिडिओ इंटरनेटवर टाकले. यानंतर हॉस्टेलमधील मुलींना आपले असे व्हिडिओ इंटरनेटवर पाहून धक्का बसला. यामुळे मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा