मनसेचे नेते अमित ठाकरे आहेत तरी कोण?

मुंबई : मनसेच्या महाअधिवेशनात अखेर गुरुवार (दि.२३) मोठी घोषणा झाली. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करून राजकीय लॉन्चिंग करण्यात आली आहे.
सर्व मनसैनिकांच्या संमतीनं अमित ठाकरे यांच्या नावाचा ठराव पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडला. त्यानंतर त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
अमित ठाकरे आजपर्यंत राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंप्रमाणे ते राजकारणात सक्रीय नव्हते.
अमित ठाकरे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून भेटी-बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत मनसेचा जोरदार प्रचार केला होता.
अमित ठाकरेंनी मुंबईतील पोद्दार कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.अमित यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाली असली तरी त्यांच्यासमोर पक्षामध्ये नवीन चैतन्य आणण्याचे आव्हान असणार आहे.
पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत (२००९) मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. त्यानंतर मनसेची पिछेहाट झाली.
ज्या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता होती किंवा ते ‘किंगमेकर’ होते, तिथेही त्यांची पिछेहाट झाली आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक तर मनसेने लढवली नाहीच. पण अपयशाचा परिणाम संघटनेवरही झाला.
महाराष्ट्र विधानसभेवेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जवळ जाऊन त्यांच्या ‘आघाडी’त सामील न झाल्यानं मनसेबद्दल अनेक मतं तयार झाली आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यापासून गेल्या निवडणुकीत मोदी-अमित शाहांवर टीका करणाऱ्या प्रचारसभा घेऊन, आता पुन्हा भाजपसोबत राजकीय युतीच्या शक्यतेपर्यंत मनसे आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मिताली बोरुडे यांचा गतवर्षी विवाह झाला. मिताली ही ओबेसिटी सर्जन डॉ.संजय बोरुडे यांची मुलगी आहे.
अमित आणि मिताली कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांना ओळखतात. गेली १० वर्षं ते एकमेकांचे मित्र असल्याचे सांगितले जाते.
अमित ठाकरे आजारी होते, त्यावेळी मितालीने अमितला खंबीर साथ दिली असल्याचे अमित यांच्या जवळचे मित्र सांगतात. अमित आणि मिताली गेली अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत, विशेष म्हणजे मिताली आणि राज यांची मुलगी उर्वशी या दोन्ही जीवलग मैत्रिणी आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा