मुंबई, १९ ऑक्टोबर २०२२: कोरोना काळात जीव धोक्यात घालून राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखणाऱ्या राज्यातील पोलिसांची दिवाळी देखील गोड व्हावी, यासाठी दिवाळीला पोलिसांनाही बोनस देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
सणवार असो की कोणतीही आपत्ती असो की संकट असो, सदैव सतर्क आणि कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील पोलीस बांधवांची दिवाळी त्यांना देखील बोनस देऊन गोड करावी अशी मागणी पक्षाचे सरचिटणीस श्री. मनोज चव्हाण ह्यांनी काल केली. pic.twitter.com/47JOuZEMfz
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 19, 2022
काय म्हणाले पत्रात ?
खाजगी कंपन्या, शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी मध्ये बोनस दिला जातो मात्र, सणवार असो की कोणतीही आपत्ती असो की संकट असो, सदैव सतर्क आणि कार्यरत असणाऱ्या पोलिसांना मात्र बोनस मिळत नाही हा अन्याय आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलीस बांधवांना बोनस देऊन त्यांची दिवाळी देखील गोड करावी.
महाराष्ट्र पोलीस बांधव हे सण, उत्सव, नैसर्गिक आपत्तीसह अतिरेकी कारवायांमध्ये कर्तव्य बजावत असतात. गर्दीत वर्दी असते म्हणूनच धर्माचा उत्सव उत्साहात साजरा होतो. त्यामुळेच, सणासुदीच्या काळाततरी महाराष्ट्र पोलिसांना आर्थिक समाधान द्यायला हवे, असे मनोज चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, यंदा दिवाळीला पोलीस बांधवांना बोनस द्यावा, अशी मागणीच पत्राद्वारे केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.