शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला

मुंबई, १९ ऑक्टोंबर २०२२ : शेअर बाजारात आजही तेजी दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली होती. परंतु गेल्या दोन दिवसांत शेअर बाजार तेजीत असल्याचे दिसून आले आहे. शेअर बाजाराची सुरवात आजही तेजीसह झाली. सेन्सेक्स ५९,१९६.९६ अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक १७,५७८.१५ अंकांवर खुला झाला आहे.

बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजी दिसून आली. सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२७ अंकांनी वधारत ५९,२८८.५४ अंकांवर व्यवहार करत होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ८६ अंकांनी वधारत १७,५७३.२५ अंकावर व्यवहार करत होता.

मंगळवारी शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५४९ अंकाची वाढ नोंदवण्यात आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १७५ अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये ०.९४ टक्क्यांची वाढ होऊन तो ५८,९६० अंकांवर पोहोचला. निफ्टीमध्ये १.०१ टक्क्यांची वाढ होऊन तो १७,४८७ अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही ३९८ अंकांची वाढ होऊन तो ४०,३१८ अंकांवर पोहोचला होता.

शेअर इंडिया’ चे उपाध्यक्ष आणि संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, आज दिवसभर बाजार १७३००-१७६०० अंकांच्या दरम्यान व्यवहार करण्याची अधिक शक्यता आहे, तसेच बँक निफ्टीतही आज तेजी राहण्याचा अंदाज वर्तवला. बँक निफ्टी ४०२००-४०७०० या दरम्यान व्यवहार करण्याचा अंदाज वर्तवला आहे.

तसेच अनुकूल जागतिक आणि देशांतर्गत संकेतांमुळे भारतीय भांडवली बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या नरमलेल्या किमती आणि दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या दमदार आर्थिक कामगिरीमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण कायम आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सप्टेंबरमध्ये चलनवाढीचा दर शिगेला पोहोचला आहे. पण यापुढील काळात महागाईचा दर कमी होईल असा विश्वास मध्यवर्ती बँकेने व्यक्त केल्याने बाजारात सकारात्मकता कायम आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा