ऐन दिवाळीत शेअर मार्केट डाऊन, सेन्सेक्स २८७ अंकांनी घसरून ५९५४३ वर बंद

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२२ : मंगळवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स २८७ अंकांनी घसरून ५९५४३ वर बंद झाला. निफ्टी ७४ अंकांनी घसरून १७६५६ च्या पातळीवर पोहोचला. सेन्सेक्समधील ३० पैकी २० शेअर्स घसरले होते. सलग ७ दिवसांनंतर बाजारात ही घसरण झाली. त्याच वेळी, केवळ १० शेअर्समध्ये काही अंशी वाढ दिसून आली. दिवाळीच्या मुहूर्ताच्या व्यवहारात बाजार ५०० हून अधिक अंकांनी वाढून बंद झाला होता.

आयटी, मेटल आणि फार्मा क्षेत्रातही तेजी दिसून आली. दुसरीकडे, बँका, वित्तीय सेवा, खाजगी बँका, रियल्टी, एफएमसीजी आणि मीडिया क्षेत्र घसरले. ब्रिटानिया, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, यूपीएल आणि एचडीएफसीसह ३२ शेअर्स घसरले.

टेक महिंद्रा, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील, एलटी, आयशर मोटर्स, डॉ रेड्डी, एनटीपीसी आणि एसबीआयसह १८ शेअर्स निफ्टी-५० वर वाढले. PSU बँक क्षेत्रात सर्वाधिक ३.५०% वाढ झाली आहे. NSE च्या ११ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी ५ मध्ये वाढ झाली. ऑटो क्षेत्र देखील १% पेक्षा जास्त वाढले.

दिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी, सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ६०००० चा टप्पा ओलांडला होता. त्याचवेळी निफ्टी १७८०० च्या पुढे पोहोचला होता. त्यानंतर सुरुवातीच्या चढ-उतारानंतर नफा वसूलीमुळे बाजाराने घसरण नोंदवली.

दुसरीकडे भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीत वाढ दिसून आली. २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०४४४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला. चांदीबद्दल बोलायचे झाले तर ती ५६५९६ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी मजबूत झाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा