राज्यपालांच्या विरोधात मनसे, शिवसेना आक्रमक…तर कोणाचे राज्यपालांना समर्थन, राज्यपालांचे स्पष्टीकरण

4

मुंबई, ३० जुलै, २०२२: मनसे सेना कायमच मराठी माणसासाठी लढत आहे. मुंबईतून बिहारी लोकांना हुसकावून लावण्यासाठी मनसे कार्यशील आहे. मुंबईत मराठी माणसाबरोबर गुजराथी आणि राजस्थानी लोकंही वास्तव्यास आहेत. मात्र यात आता राज्यपालांच्या वक्तव्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. त्यात त्यांनी नुकतचं असं विधान केलं की, मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषत: मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी आणि गुजराथी समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे. राजस्थानी आणि गुजराथी मुंबईतून गेले तर मुंबईचं काय होणार? असं वादग्रस्त विधान राज्यपालांनी एका कार्यक्रमात दिलं आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना यांच्या हातात आयतं कोलीत मिळालं आहे.

मनसे पहिल्यापासून मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना खडे बोल सुनावत सांगितलं आहे की, तुम्ही वातावरण गढूळ करु नका. आम्ही केलेल्या मशागतीवर तुम्ही पाणी फिरवू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं की तुम्ही गुण्यागोविंदाने रहा. नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका. अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील. असं त्यांनी निक्षून सांगितलं.
तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे, की या वक्तव्या विरोधात राज्यपालांचा राजीनामा घेऊन दाखवा, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

राज्यपालांनी माफी न मागितल्यास आम्ही आंदोलन करु, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

भाजप या सर्व राज्यपालांच्या वक्तव्यांशी सहमत नाही. महाराष्ट्रात मराठी माणसांचे योगदान सर्वाधिक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी सांगितलं. तर प्रकाश आंबेडकरांनी या राज्यपालांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.

या सर्व टीकेनंतर नुकतच राज्यपालांनी या वक्तव्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान आहे. माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला, असंही त्यांनी स्पष्ट केलं. माझ्याकडून मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यामुळे आधी चूक, मग चुकीचं स्पष्टीकरण असं म्हणत राज्यपाल आपल्या वक्तव्याची सारवासारव करत आहे, असंच म्हणावं लागेल.

विविध स्तरातून विविध प्रतिक्रिया येत असताना आता राज्यपाल यापुढे काय बोलणार, आणि इतर जण काय अँक्शन घेणार, हे पहाणं गरजेचं ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा