मनसेचा पनवेलमध्ये आज मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डया विरोधात निर्धार मेळावा,राज ठाकरे महामार्गाची पाहणी करण्याची शक्यता

पनवेल, १६ ऑगस्ट २०२३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पनवेलमध्ये तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात मनसेचा निर्धार मेळावा होणार आहे. या निर्धार मेळाव्यात मनसेकडून काय निर्धार केला जातो? त्याकडे राजकीय जाणकरांचे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भाजपाकडून ऑफर असल्याच वक्तव्य केले होते. त्यावर राज ठाकरे आज काय बोलणार? मनसेची भूमिका काय असेल? याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुक्ता आहे.

मागच्या आठवड्यात पुण्यात व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यावर राज ठाकरे काय बोलणार? याकडेही लक्ष असेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या महिन्याभरापूर्वी फूट पडली. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत सहभागी झाली. दुसरी टीमही लवकरच सत्तेत सहभागी होईल. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी घडतायत, त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल इंडिया आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. यावर राज ठाकरे काही भाष्य करणारा का? हे औत्सुक्याचे आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडले आहेत. प्रवासी या मार्गावरुन प्रवास करताना अक्षरक्ष: हतबल होतात. त्या विरोधात मनसेने हा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. स्वत: राज ठाकरे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्याचीही शक्यता आहे.पनवेल शहरात या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांविरोधात विभागावर आंदोलन करणार आहेत.

पुढच्या महिन्य़ात गणेशोत्सव आहे. मुंबईतून दरवर्षी लाखो कोकणवासीय याच मुंबई-गोवा महामार्गावरुन कोकणात जातात. त्या दृष्टीने मनसेचा हा निर्धार मेळावा महत्त्वाचा आहे. या निर्धार मेळाव्याने कोकणवासीयांच्या प्रवासाच्या हाल अपेष्टा कमी व्हाव्यात अशी अपेक्षा कोकणातील नागरिकांना नक्कीच आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा