मध्यप्रदेश, ८ एप्रिल २०२३: मध्य प्रदेशमधील बुरहापूर जिल्ह्यातील नेपानगर पोलीस स्टेशनवर जमावाने हल्ला केला आहे. यानंतर जमावाने पोलीस कोठडीतील तीन आरोपींसह पलायन केले. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. नेपानगर पोलीस स्टेशनवर रात्री चार पोलिस कर्मचारी होते. जमावाने अचानक पोलीस स्टेशनवर हल्ला केला.
पोलीस कर्मचाऱ्यांना काठीने मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये हल्लेखोर पोलीस स्टेशनची तोडफोड करताना आणि पोलिसांना काठीने मारहाण करताना दिसत आहेत. जमावाने पोलिस ठाण्याच्या मुख्य गेटच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक गुलाब सिंह यांच्यासह अजय मालवीय गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतबाबत बुरहापूरचे पोलीस अधीक्षक राहुल कुमार लोढा यांनी सांगितले की, पोलिसांनी मेघवाल या संशयित आरोपीला लूटमार प्रकरणी अटक केली होती.
त्याला नेपानगर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. रात्री अचानक मेघवाल यांच्या साथीदार सुदियासह ५० हून अधिक जणांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. यानंतर मेघवालसह पोलीस कोठडीत असणाऱ्या दोघांनी पलायन केले. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर