कराड, ३० सप्टेंबर २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं २५ मार्च पासून देशभरात लाॅकडाऊन घोषित केलं. त्या दिवसापासून संपूर्ण देशात सर्व शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान पाहता सरकारनं ऑनलाईन शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, यातही भरपूर समस्या समोर येऊ लागल्या. हे ऑनलाइन शिक्षण गरीब विद्यार्थ्यांना तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कितपत परवडणारं आहे याचा सरकारनं विचार केला नाही. कित्येक वेळा विद्यार्थ्यांना रेंज मिळत नाही म्हणून कधी डोंगरावर तर कधी झाडावर चढावं लागलं. मात्र, आता असा प्रकार समोर आलाय की, ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध नसल्यानं एका शाळकरी विद्यार्थिनीनं गळफास घेतलाय.
कराड तालुक्यातील ओंड येथे ही धक्कादायक घटना घडलीय. या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांनीच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. २००७ मध्ये या विद्यार्थिनीच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर विद्यार्थिनी, तिचा भाऊ आणि आई यांनी स्वतः कष्ट करून घर चालवलं होतं. सध्या ही विद्यार्थिनी दहावीत शिक्षण घेत होती.
ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी त्या विद्यार्थिनीकडे मोबाईल नव्हता. त्यामुळं ती नैराश्यात होती. मोबाईल नसल्यानं तिला अभ्यास करता येत नव्हता. त्यामुळं तिला अभ्यासाचा तणाव आला होता. काल (२९ सप्टेंबर) दुपारी तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी तिनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे