तमिळनाडूतील मंदिरांत आता मोबाईल वापरावर बंदी

मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य कायम ठेवण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाचे निर्देश

पुणे, ४ डिसेंबर २०२२ : आता तमिळनाडूतील मंदिरांत मोबाईल फोन वापरावर बंदी घालण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य कायम ठेवण्यासाठी मोबाईलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं कोर्टानं सांगितलं आहे.

सध्या अगदी लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण मोबाईलचा वापर करताना दिसतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सगळीकडे मोबाईल वापरतो; पण आता तुम्ही तुमचा मोबाईल कुठे वापरायचा आणि कुठे नाही यावर निर्बंध येत असतील तर? हो आणि त्याबाबतचे निर्देश खुद्द उच्च न्यायालयाने दिले आहेत. कुठेही नव्या ठिकाणी, न पाहिलेल्या किंवा फोटोजेनिक ठिकाणी गेल्यावर आपसुकच आपल्या खिशातून आपण मोबाईल बाहेर काढतो. किंबहुना ते क्षण टिपणं आपल्याला आवश्यक वाटतं. हल्ली देवदर्शनासाठी मंदिरात गेल्यावर देखील देवापुढे नतमस्तक होण्यापूर्वी फोटो क्लीक केला जातो. मंदिराच्या नियमांच्या विरोधात असतानाही भक्त गुपचूप मंदिरात मूर्ती आणि पूजेचे फोटो घेतात.

एवढंच नाही तर मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक रांगेत उभे असताना देखील मोबाईल फोनवर जोरजोरात बोलताना दिसतात. या सगळ्या बाबींचा विचार करीत मद्रास उच्च न्यायालयाने यासंबंधी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य कायम ठेवण्यासाठी मोबाईलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं कोर्टानं सांगितलं. न्यायालयाने संपूर्ण तमिळनाडूमधल्या मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरावर बंदी लागू करण्याचे निर्देश तामिळनाडू सरकारला दिले आहेत.

मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता तमिळनाडू राज्यातील कुठल्याही मंदिरात मोबाईल फोन वापरता येणार नाही. तर न्यायलयाच्या आदेशास न जुमानता ज्याने कुणी असा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल; तसेच भक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून मंदिराच्या बाहेरच मोबाईल फोन ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था करण्यात यावी. तसेच आदेशाचं पालन व्यावस्थित करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देस उच्च न्यायालयाने दिले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा