नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२०: राज्यसभेत झालेल्या गदारोळानंतर कृषी विधेयक मंजूर करताना संध्याकाळी राजनाथ आणि केंद्रातील सहा मंत्र्यांनी विरोधकांविरूद्ध भाष्य केलं. उपसभापतींच्या वागण्यावर सरकारनं नाराजी व्यक्त केली. या पत्रकार परिषदानंतर लगेच काँग्रेसनंही पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्ला केलाय.
राज्यसभेत कृषी संबंधित दोन विधेयके आवाजी मतदानानं मंजूर झाली आहेत. या बिलांबाबत सभागृहाच्या आत आणि बाहेरही विरोधकांमध्ये बराच गदारोळ झाला आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं याला काळा दिवस म्हणून संबोधले असून, मोदी सरकार, राजकीय पक्ष, शेतकरी आणि संसदेकडं दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
या विधेयकाबाबत काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या विषयावर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीवर वार केले आहेत. सरकारकडं बहुमत नसल्याचे समजल्यावर सरकारनं अवाजी मतानं हे विधेयक मंजूर केलं. आपल्या लोकशाहीच्या ७३ वर्षातील हा काळा दिवस आहे. हा नियोजित हल्ला होता. २०२० मध्ये स्वातंत्र्याचा लढा पंतप्रधान मोदींविरूद्ध लढला जाईल.
पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, सरकार राजकीय पक्ष, शेतकरी आणि संसद यांना दुर्लक्षित करत आहे. मुख्य सचेतक जयराम रमेश यांनी विनंती केली की मंत्री उद्या उत्तर देतील आणि उद्या हे विधेयक मंजूर केले जाईल, परंतु राज्यसभेचे उपसभापती यांनी ते मान्य केलं नाही.
केसी वेणुगोपाल म्हणाले की, खासदारांचा मूलभूत अधिकार रोखला गेला आहे, याला जबाबदार कोण आहे. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. राजनाथ सिंह यांनी उपसभापतींच्या कार्याचा निषेध करण्यापेक्षा त्यांच्या कृती न्याय्य ठरवल्या आहेत. आजचा संपूर्ण भाग भाजपाच्या माध्यमातून कारस्थान होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे