मोदी सरकार बोल बच्चन बंद करा अन् रोजगार द्या –  सत्यजित तांबे 

मुंबई, दि. ९ ऑगस्ट २०२०: एकीकडे कोरोनाचं जागतिक संकट देशावर आहे तर, दुसरीकडे दिवसेंदिवस मोदी सरकार आपल्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील युवकाला बेरोजगारीच्या खाडीत ढकलत आहे, असा आरोप काँग्रेस नेते सत्यजित तांबेंनी केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सत्यजित तांबे यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

भारतात आलेल्या आर्थिक मंदी बाबत बोलताना तांबे म्हणाले कि, मोदी सरकारनं चुकीचे निर्णय घेतले. नोटबंदी, जीएसटी, बड्या उद्योगपतींची कर्जमाफी आणि या कर्जमाफीमुळे बँकांची झालेली दुरावस्था यासाठी मोदी सरकार जबाबदार असल्याचं ते म्हणाले. त्याचप्रमाणे देश आर्थिक मंदीत असतानाच कोरोनाचं संकट आलं आणि त्यामुळे देशातील युवकांना मोठया प्रमाणावर बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.

“रोजगार दो” मोदी सरकार…….

मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत दरवर्षी २ करोड रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक युवक – युवती पदवीधारक असूनही बेरोजगार आहेत त्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचं सत्यजित तांबे म्हणाले. मोदी सरकारनं आता सगळे बोलबच्चन बंद केले पाहिजे आणि युवकांच्या हाताला काम दिलं पाहिजे. त्यामुळे आजपासून मोदी सरकार विरोधात “रोजगार दो” हे आंदोलन आम्ही करत आहोत, अशी माहिती सत्यजित तांबेनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा