नवी दिल्ली (वृत्त संस्था) : जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर आता मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सरकार दोन केंद्र शासित प्रदेश दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली एकत्र करण्याच्या विचाराधीन आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी लोकसभेत या संबंधित एक विधेयक सादर केले.त्या विधेयकात म्हटले आहे की, दादरा-नगर हवेली आणि दीव-दमण विधेयक २०१९ पुढच्या आठवड्यातील प्रस्तावित कामकाजाचा भाग आहे. अशी माहिती एक वृत्तवाहिनीने दिली आहे.
गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या या दोन्ही केंद्र शासित प्रदेशांना एकत्र केल्यामुळे येथे चांगले प्रशासन मिळेल. दादरा नगर हवेलीमध्ये एक आणि दीव-दमणमध्ये २ जिल्हे आहेत.
एकमेकांपासून ३५ किलोमीटर वर असलेल्या या दोन्ही राज्यांचे स्वतंत्र सचिवालय आहे. शिवाय यांचे बजेटही वेगवेगळं आहे. पण दोन्ही केंद्रशासित प्रदेश एकत्र केल्यामुळे खर्च कमी होणार आहे.
जम्मू-काश्मीर आणि लद्दाखला केंद्र शासित प्रदेश केल्यामुळे केंद्रशासित प्रदेशांची संख्या ९ झाली होती. आता दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र केल्यामुळे ही संख्या ८ होणार आहे. याचवर्षी ऑगस्ट महिन्यात मोदी सरकारने मोठा निर्णय घेत जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा अधिकार काढून घेतला होता.
अनुच्छेद ३७० हटवत ५ ऑगस्टला संसदेत जम्मू काश्मीर पूनर्गठन विधेयक सादर करण्यात आले होते. ज्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लद्दाख अशी दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आली होती.