मुंबई: सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असलेल्या व जगभरात कोट्यवधी ‘फॉलोअर्स’ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजमाध्यमांना सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी (3 मार्च) अचानक जाहीर केला. मात्र त्यानंतर मंगळवारी नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा ट्विट करुन नवीन खुलासा केला. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याने त्यादिवशी माझं सोशल मीडियावरील अकाऊंट महिलांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या महिलेकडून आपल्या प्रेरणा मिळते तिची यशस्वी गाथा मांडा, लाखो महिलांना प्रेरणा देईल अशा स्टोरी शेअर करा असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. या संपूर्ण घडामोडीवर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून तिरकस शब्दांत भाष्य करण्यात आलं आहे.
खरंतर ‘सोशल मीडिया’ हा तर भाजपचा पंचप्राणच! २०१४ चा लोकसभा रणसंग्राम भाजपने सोशल मीडियावर सायबर युद्ध करूनच जिंकला. गोबेल्स नीतीचा वापर त्या वेळी झाला व काँग्रेस राजकीय पटलावरून अदृश्य झाली. पण भाजपच्या सायबर फौजेचे सेनापती नरेंद्र मोदी हेच मैदान सोडून निघून जात आहेत, असा संदेश पंतप्रधानांच्या कालच्या ट्विटमुळे गेला किंवा तो जाणीवपूर्वक तसा जाऊ दिला गेला. त्यावरून चर्चेचे घमासान सुरू झाल्यानंतरही लगेच खुलासा न करता चर्वितचर्वणाचा प्रयोग रंगू दिला गेला. नाट्य पुरेसे रंगले आहे हे ध्यानात आल्यानंतर नवा क्लायमॅक्स पुढे करून धक्का देण्याचे तंत्र खुबीने वापरले गेले.
आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत कुशलतेने करण्यात मोदी पटाईत आहेत. साडेपाच कोटींपेक्षा जास्त लोक मोदी यांना ट्विटरवर ‘फॉलो’ करतात. मोदींचे फेसबुक पान पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचते. इन्स्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून मोदी रोज कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतात. आता हे सर्वकाही सोडण्याचा निर्णय मोदी घेतीलच कसा? कारण सोशल मीडियाचा वापर म्हणजे नशापाणी नसले तरी त्याची एक धुंदी आणि अंमल असतोच. ती धुंदी इतक्या सहजासहजी सुटणे कठीणच.
इतके ‘फॅन फॉलोइंग’ सोडून मोदींनी सोशल मीडियातून संन्यास घेणे म्हणजे भांडवलशहा अमेरिकेने कम्युनिस्टांचा साम्यवाद स्वीकारण्यासारखेच होते!
सोशल मीडियाचा वापर हा एक छंद आहे. स्त्रियांना नटण्या-मुरडण्याची हौस असते. कुणाला छानछोकीची हौस असते, कुणाला उत्तम खाण्यापिण्यात आनंद मिळतो. तसा मोदी यांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्यात आनंद मिळत असतो.
आपलीच चर्चा सदैव व्हावी व आपल्यावरच कॅमेऱ्यांचा झोत राहावा याकडे त्यांचा कटाक्ष असतो. सोशल मीडियावर यासाठीच ते सक्रिय राहतात. त्यामुळेच सोशल मीडियापासून दूर होण्याच्या काही तासांच्या अफवेवरील धूळ झटकून मोदींनी उलट जागतिक महिला दिनी देशातील निम्म्या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी नवी शक्कल लढवली.