विदर्भात मान्सूनचे आगमन, इतर महाराष्ट्रात २५ जूनला मान्सून होणार जास्त सक्रिय

पुणे २४ जून २०२३: महाराष्ट्रात मान्सून हळूहळू दाखल झालाय. आज नागपूरसह विदर्भातील अनेक भागात पाऊस झाला, तसेच मुंबई ठाणे उपनगरात म्हणजेच अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीत पाऊस झाला. मुंबई-पुण्यात तुरळक पाउस पडला असून, आता २५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातील लोकांना आणखी एक दिवस मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे असे चित्र असले तरी, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मान्सून आजपासून सक्रिय होईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज-उद्या मान्सून दाखल होण्याचा जोरदार अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी हलका पाऊस झाला, काही ठिकाणी मुसळधार पाऊसही झाला. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक येथे २५ जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दिवशी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. २७ जूननंतर घाट भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

शुक्रवारी कोकण विभागातील काही भागात पावसाला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, तालुक्‍यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली, तुरळक पावसानंतर आता शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आज-उद्या मान्सून तळकोकण भागात जास्त सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.

सुरुवातीला या वेळी मान्सूनमध्ये ९६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज, हवामान खात्याने वर्तवला होता. पण मान्सूनने ओढ दिल्याने, महाराष्ट्रातील बहुतांश भागातील शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आकाशाकडे टक लावून बसले आहेत. आता हवामान खात्याने २५ जून ही मान्सून सक्रीयतेची नवीन तारीख दिलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा