Alandi Pandharpur Wari Devotion Amidst Rain and Traffic: आषाढी वारीच्या उत्साहात पाऊस आणि अभूतपूर्व वाहतूक कोंडी हे अडथळे ठरले असले तरी, वारकऱ्यांचा उत्साह आणि विठ्ठल नामाचा गजर किंचितही कमी झालेला नाही. चाकण, मोशी, भोसरीसह आळंदीकडे येणारे सर्व रस्ते वाहतूक कोंडीने पूर्णपणे ठप्प झाले आहेत. जवळपास सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, कित्येक तासांपासून गाड्या एकाच जागी थांबल्या आहेत. मात्र, या कोंडीतही वारकरी थांबायला तयार नाहीत!
एरव्ही वाहतुकीचे नियम पाळणारी शिस्तबद्ध गर्दी आज विठ्ठलाच्या भेटीसाठी अधीर झाली आहे. जिथे वाहनांना जायला जागा नाही, तिथे पायी चालणारे वारकरी मिळेल त्या चिंचोळ्या वाटेने पुढे सरकत आहेत. पावसाचा जोर वाढलेला असूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची नाही तर भक्तीची ओढ स्पष्ट दिसतेय. भजन, कीर्तन आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ चा जयघोष करत लाखो भाविक आळंदीच्या दिशेने कूच करत आहेत.
सध्या आळंदीकडे येणाऱ्या विविध मार्गांवरून सुमारे चार ते पाच लाख भाविक येत असल्याची माहिती आहे. वाहतूक कोंडी पुढील पाच ते सात तास तरी सुटण्याची शक्यता नसतानाही, वारकरी मिळेल तिथे विसावून किंवा धीम्या गतीने का होईना, आपली पाऊले पुढे टाकत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस इतकी तीव्र आहे की, पाऊस, चिखल आणि वाहतूक कोंडी हे सारे अडथळे भक्तीच्या या महासागरात वाहून गेले आहेत.
पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असले तरी, ही गर्दी आणि वारकऱ्यांची अलोट श्रद्धा पाहता, आषाढी वारी म्हणजे खऱ्या अर्थाने भक्तीचा एक न थांबणारा प्रवाहच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे
