मुंबईत 24 तासांत 1300 हून अधिक रुग्ण, तर दिल्लीत 500 पॉझिटिव्ह

मुंबई, 29 डिसेंबर 2021: राज्यात कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 1377 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एक हजारांहून कमी प्रकरणांची नोंद झालेल्या मुंबईने आता पुन्हा तो आकडा ओलांडला आहे. वाढत्या प्रकरणांशिवाय 24 तासांत एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. इतर राज्यातही प्रकरणे वाढत आहेत. तामिळनाडूमध्ये आज 619 प्रकरणे नोंदवण्यात आली असून 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तर राजधानी दिल्लीत कोरोनाने धोकादायक वेग पकडला आहे. गेल्या 24 तासांत 496 नवीन रुग्ण आढळले आहेत. अनेक महिन्यांनंतर दिल्लीतही केसेस अधिक येत आहेत आणि संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे. परवा राजधानीत 311 प्रकरणे नोंदवली गेली होती, मात्र आता तो रेकॉर्डही मोडला गेला आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1612 वर पोहोचली आहे.

वाढत्या प्रकरणामुळे आता दिल्लीतही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या राजधानीत यलो अलर्ट सुरू आहे. या अलर्टमुळे दिल्लीत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय सिनेमा हॉल, बँक्वेट हॉल, स्पा बंद करण्यात आले आहेत. उपाहारगृहेही पन्नास टक्के क्षमतेने चालू आहेत.

सीएम केजरीवाल यांनीही आज आपल्या भाषणात दिल्लीतील कोरोनाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून बदलती परिस्थिती लक्षात घेऊनच निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. सध्या राजधानीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. आता ओमिक्रॉनची प्रकरणेही वेगाने वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. सध्या दिल्लीत ओमिक्रॉनचे 165 रुग्ण आढळले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा