गोविंदबाग समोरील आंदोलन, दहाजणांविरोधात गुन्हा दाखल

बारामती,२६ सप्टेंबर २०२० : धनगर समाजाचा अनुसुचित जमाती संवर्गाचे आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानासमोर आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात बारामती तालुका पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पांडूरंग मारुती कचरे (रा. काटेवाडी, ता. बारामती), गोविंद देवकाते (रा. निरावागज, ता. बारामती), गणेश कोकरे (रा. पणदरे, ता. बारामती), अजित मासाळ (रा. काटेवाडी), भारत देवकाते (रा. मेखळी, ता. बारामती) व अन्य पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम २६९ व महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस कर्मचारी नितीन चव्हाण यांनी फिर्याद दिली.

माळेगाव बुद्रूक गावच्या हद्दीत शारदानगर येथील गोविंदबाग समोर धनगर समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले.पुणे ग्रामीण विभागामध्ये महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार जमावबंदी लागू केली असताना त्याचे उल्लंघन करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कोविड विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असताना सोशल डिस्टन्सिंग न राखता तोंडावर मास्क न घालता हयगयीची कृती आंदोलकांनी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा