पुणे, २८ डिसेंबर २०२०: पालक संघर्ष समितीच्या वतीने जिजामाता चौक तळेगाव दाभाडे येथे शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणाच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला सुनिल शेळके यांनी पाठिंबा दिला असून पालकांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींची पगार कपात झाली. तर अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे पालक वर्गाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत. शैक्षणिक संस्था फी वसुलीसाठी तगादा लावत आहेत. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी करुन घेत नाहीत. पालकांना अर्वाच्च भाषेत उत्तरे देऊन अपमानास्पद वागणूक दिली जाते.
शिक्षण हा सर्वांचा मुलभूत अधिकार आहे. आणि कोणीही त्यापासून वंचित राहु नये. कोरोनाच्या संकटामुळे सर्वच शाळा बंद असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत योग्य निर्णय संस्थाचालकांनी घेतला पाहिजे. कोरोनाचे सावट असताना पालकांचा, विद्यार्थ्यांचा विचार संस्था का करत नाहीत ? विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, पालकांची चिंता कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना फी माफ करण्याबाबत निर्णय संस्थाचालकांनी घ्यावा. खासगी शाळांकडून पालकांची आणि विद्यार्थ्यांची अडवणूक होत असताना पालकांपुढे आंदोलनाशिवाय पर्याय नाही. अनेक पालक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत, या आंदोलनाची दखल या शाळांच्या संस्थाचालकांना घ्यावीच लागेल. नाहीतर अधिक तीव्र मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे