खासदार नवनीत राणांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे, खासदार इम्तियाज जलील अमरावतीतून लढणार?

अमरावती २६ जून २०२३: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, या मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी देशात मोदी सरकार आले तर राज्यात फडणवीस सरकार होते. नंतर राज्यात राजकीय घडामोडी घडुन वेगळे सरकार अस्तित्वात आले, तेव्हा पासून नवनीत राणा यांच्या भूमिकेत बदल पाहायला मिळाला. मागच्या काळात हनुमान चालीसावरून उद्धव ठाकरे सरकार बरोबर त्यांनी वाद ओढवून घेतला होता. यानंतर राज्यात पुन्हा सत्तांतर होऊन शिवसेना-भाजपचे सरकार आले. परंतु आता त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झालाय.

अमरावती लोकसभा मतदार संघ हा युतीसाठी कळीचा मुद्दा ठरला आहे. येथे विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला असुन पुढची निवडणूक भाजपच्या पाठिंब्यावर लढणार असल्याचे त्यांनी जाहिर केले आहे. त्याचदरम्यान प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी देखील अमरावती लोकसभेवर आपला दावा सांगितलाय. तर अमरावती लोकसभेचा खासदार शिवसेनेचाच होणार, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला.

त्यामुळे नवनीत राणा यांच्यासमोर आधीच इतकी संकंटे असतानाच, आता त्यांच्याविरोधात आणखी एक खासदार उतरणार आहे. यावरून सध्या अमरावतीत चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. अमरावतीतून लढण्यासाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी परवानगी दिली, तर आपण नवनीत राणा यांच्याविरोधात उतरू असे संकेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिले. त्याचबरोबर त्यांनी खासदार राणांना मतदान करून काय मिळाले असा सवाल मतदारांना केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा