उस्मानाबाद, दि. ३० जून २०२० : उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली गावामध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने गावात गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काल दिनांक २९ जून रोजी गावाला भेट देऊन संपूर्ण गावातील स्थितीचा आढावा घेतला.
आपल्या गावात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने गावकरी घाबरून गेले असताना, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे मनोबल वाढवले. सोबतच, आर्सेनिक अल्बम- ३० या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या गावकऱ्यांना वाटपास सुपूर्द केल्या. प्रतिबंध केलेल्या भागांमधील शेतकऱ्यांना लागणारे बी बियाणे त्यांच्या बांधावर जाऊन द्यावे. तसेच, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या. प्रशासन या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात ग्रामस्थांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साथ द्यावी असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ग्रामस्थांना केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार कैलास घाडगे पाटील, तालुकाप्रमुख सतिश कुमार सोमाणी , तहसीलदार श्री गणेश माळी, गटविकास अधिकारी श्रीमती दिवाणे मॅडम, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी आणि ग्रामस्थ आदी त्याप्रसंगी उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.