खासदार सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहून एक विशेष मागणी केली आहे.

७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती या वर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती समाजामध्ये खूप आदर व आपुलकी आहे, असे त्यांनी नमूद केले.

नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची १२५ वी जयंती दि. ७ फेब्रुवारी, २०२३ रोजी येत आहे. माता रमाई व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९०६ मध्ये भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये विवाहबद्ध झाले. तेव्हापासून त्यांनी भारतरत्न बाबासाहेबांना शेवटपर्यंत साथ दिली. माता रमाई एक साध्या व कर्तव्यदक्ष स्त्री होत्या.

डॉ. बाबासाहेबांच्या अनेक सामाजिक चळवळी आणि सत्याग्रहांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्यामुळे डॉ. बाबासाहेबाच्या चळवळीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायच्या. माता रमाई यांनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा असून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत व नविन पिढीला मार्गदशक ठरण्याकरिता प्रबोधन, लोकशिक्षणाच्या हेतूने यावर्षीची त्यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करण्याकरिता राज्य शासनाने निर्णय घ्यावा अशी आपणास विनंती आहे.

तसेच शासनाच्या वतीने संपूर्ण वर्षभरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशित केल्या जाणाऱ्या यादीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती दरवर्षी साजरी करण्याबाबत कायमस्वरूपी समावेश करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी या पत्राव्दारे केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा