कोणताही खेळाडू मैदानातून रिकाम्या हाताने परतत नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जयपूर, ५ फेब्रुवारी २०२३ : राजधानी जयपूर येथे आयोजित ‘जयपूर महाखेल’ या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खेळाडूंना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की देशात सुरू झालेली क्रीडा स्पर्धा आणि खेल महाकुंभ यांची मालिका हे एका मोठ्या बदलाचे द्योतक आहे. तरुणाईचा उत्साह भरलेला आहे. स्वातंत्र्याच्या या सुवर्णकाळात देश नव्या व्याख्या तयार करीत आहे, नवीन यंत्रणा उभारत आहे आणि राजस्थानची भूमी केवळ तरुणांच्या उत्साह आणि क्षमतेसाठी ओळखली जाते. या कार्यक्रमाचे आयोजन माजी केंद्रीय मंत्री आणि जयपूर ग्रामीणचे भाजप खासदार राज्यवर्धन सिंह राठौर करीत असल्याची माहिती आहे.

१२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनी जयपूर महाखेलचे उद्घाटन करण्यात आले असून, यावेळी महाखेलने कबड्डी स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचवेळी, जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील सर्व ८ विधानसभा मतदारसंघातील ४५० हून अधिक ग्रामपंचायती, नगरपालिका आणि प्रभागातील ६,४०० हून अधिक युवक आणि खेळाडू या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

जयपूर महाखेल कार्यक्रमाला संबोधित करताना खासदार राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले, की आजचे हे महाखेल पाहून मी म्हणू शकतो, की पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात क्रीडा आणि खेळाडूंचा सुवर्णकाळ आला आहे. माझ्या काळातील खेळाडू पूर्वीच्या सरकारमध्ये खेळाच्या दुर्दशेचे साक्षीदार आहेत. आता खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि सन्मान आपण पाहत आहोत, असे राठोड म्हणाले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा