उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे विजयस्तंभास अभिवादन

पुणे : पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासूनच जनसागर लोटला आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन केले. त्याचप्रमाणे वंचित आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले.
पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून बांधव गर्दी करतात.यावेळी येणाऱ्या बांधवांचे स्वागत कोरेगाव भीमा, पेरणे आदी गावातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे.

मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी रणस्तंभावर मानवंदना देण्यासाठी रात्रीपासून लाखो अनुयायी दाखल झाले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. रात्री १२ वाजल्यापासून पासून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येत असून पीएमपीएमलच्या बसेसमुळे येणाऱ्या लोकांची सोय झाली आहे. सकाळी ६.३० च्या आसपास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी स्तंभावर भेट देऊन मानवंदना दिली.

मानवंदना कार्यक्रमावर प्रशासनाचे लक्ष असून स्वतः जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांसह अनेक पोलीस अधिकारी येथे उपस्थित आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला नवीन वर्षाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे, येथील शौर्यस्तंभास एक वेगळा इतिहास आहे. दरवर्षी या ठिकाणी अभिवादनासाठी मोठ्यासंख्येने नागरिक येतात, मी राज्यातील जनतेच्या वतीने येथील शौर्यस्तंभास अभिवादन करतो. मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या. मात्र सरकार त्यामध्ये चांगल्या प्रकारची काळजी घेत आहे.
पोलीस व प्रशासनाकडून बंदोबस्त अतिशय व्यवस्थित ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील शाळा बंद ठेवल्या आहेत. दरम्यान, २५० पेक्षा अधिक व्हॉट्स ग्रुप अॅडमिन्सना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा, सणसवाडी, येथील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा