मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गुरूवारी बारामतीत

बारामती: शारदानगर येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक या शेतीविषयक प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. आज ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परीषदेत ही माहिती दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, इस्त्राईलचे राजदूत व आंतरराष्ट्रीय धोरण सल्लागार डॅन अलुफ या प्रदर्शनाच्या उदघाटनास उपस्थित राहणार आहेत. गुरूवारी (ता.१६) सकाळी नऊ वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी ठाकरे हे बारामतीतील अद्ययावत शेती तंत्राची तसेच शेतीच्या नवीन तंत्राचा अवलंब केलेल्या शेती प्रात्यक्षिकांची पाहणी करणार आहेत. हे प्रदर्शन रविवार (ता.१९) पर्यंत सुरू राहणार आहे.
बारामती तालुक्यात शारदानगर येथे होणारे कृषिक प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहे. जगभरातील नवनवे तंत्रज्ञान येथील शेतीच्या प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जाते. या प्रात्यक्षिकांची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे या प्रदर्शनात करणार आहेत. त्यानंतर येथे आयोजित जाहीर सभेत ते उपस्थित शेतकरी गटांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात होणार आहे.

बारामतीत होणार उच्चस्तरीय बैठक
ठाकरे यांच्या आगमनापूर्वी सकाळी आठ वाजता शारदानगर येथे महत्वपूर्ण उच्चस्तरीय संशोधक बैठक होणार आहे. केंद्रीय शेती संशोधन भरती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. माई, राज्याचे कृषी प्रधान सचिव डॉ.एकनाथ डवले, राज्याचे कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, बायरचे आशिया प्रमुख डॉ. सुहास जोशी, अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग, भारतीय कृषी संशोधन परीषदेचे माजी महासंचालक डॉ.ए.के. सिंग, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा, राहूरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन, कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.डी. सावंत, नागपूरच्या म्हापसूचे कुलगुरू डॉ. आशिष पाथुरकर यांच्यासह राज्य व देशातील 100 हून अधिक संशोधक या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यांच्यामध्ये महाराष्ट्रातील शेतीच्या भविष्याबाबत चर्चा होऊन त्यातील शिफारशींचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा