JICA project funding for Pune: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील मुळा-मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी ‘JICA’ प्रकल्पाला राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पांतर्गत नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी तब्बल २५ ठिकाणी नियमित तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे नदीच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे.
शहरातील सांडपाणी आणि मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्यासाठी ‘जायका’च्या सहकार्याने १० मैलापाणी शुद्धीकरण (एसटीपी) प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. या प्रकल्पांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.खराडी, वारजे, वडगाव, मुंढवा आणि मत्स्यबीज केंद्र येथील ‘एसटीपी’ ची कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.


शहरात दररोज १७५० दशलक्ष लिटर पाण्याचा वापर होतो, त्यापैकी १४०० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात ९ ‘एसटीपी’ उभारण्यात आले आहेत. सध्या ३७० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. ‘एसटीपी’ कार्यान्वित झाल्यानंतर नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले की, “मुळा-मुठा पुनरुज्जीवन प्रकल्पाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘एसटीपी’ कार्यान्वित झाल्यावर पाण्याची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून येईल.”
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे