मुलांच्या ऑनलाईन फ्रेंड्सवर पालकांचे लक्ष हवे: चव्हाण

पुणे : इंटरनेटच्या माध्यमातून मुला-मुलींच्या फसवणूकीच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या ऑनलाईन फ्रेंड्सवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी पुण्यातील पिरंगुट (ता. मुळशी) येथे महाराष्ट्र सायबर विभाग तसेच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने “सायबर सेफ वूमन” विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण बोलत होते.

कार्यशाळेत मुळशी पंचायत समिती उपसभापती विजय केदारी, सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच अण्णा गोळे, पीआयबीएम मॅनेजमेंट संस्थेचे चेतन गवळी, पौड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचा ‘सायबर सुरक्षा बाबतचा संदेश’ दाखविण्यात आला.
यावेळी चव्हाण म्हणाले, वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर उघड केल्यामुळे बरेचदा गुन्हे घडले आहेत. यासाठी स्वतः ची माहिती, छायाचित्रे, पासवर्ड, ई मेल पोस्ट करण्यापूर्वी दक्षता घेणे गरजेचे आहे. सोशल माध्यमातून अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट मुला-मुलींनी टाळायला हव्यात. सायबर गुन्हे घडू नयेत, यासाठी सायबर सुरक्षा विषयी महिलांनी माहिती घ्यायला हवी.

लवटे म्हणाले, महिला सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. संकटसमयी महिलांनी पोलीस प्रशासनाशी वेळेत संपर्क साधल्यास त्यांच्यापर्यंत तात्काळ मदत पोहचू शकते. महिलांनी दक्ष राहण्याबरोबरच मनाने खंबीर राहणे गरजेचे आहे. महिला सुरक्षेसाठी पोलीस विभागाचे विविध ऍप असून संकटसमयी या ऍपचा वापर करायला हवा.
कार्यशाळेत सायबर गुन्ह्यांचे स्वरुप, महिलांच्या बाबतीत घडणारे सायबर गुन्हे, महिलांनी घ्यावयाची दक्षता याबाबत सोदाहरणासह माहिती देण्यात आली. तसेच मोबाईल व इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची दक्षता, महिला सुरक्षा बाबतीत पोलीस प्रशासनाचे असणारे उपक्रम यांचीही माहिती देण्यात आली.कार्यशाळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी – विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा