कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह….. अतुल भातखळकर यांचे वादग्रस्त ट्विट

मुंबई, १० ऑक्टोबर २०२२: मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो.

काय आहे वादग्रस्त ट्विटचा नेमका किस्सा ?

१९८९ मध्ये लोकदलाचे प्रमुख मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांकडून बाबरी मशिदीचा मुद्दा पुढे आणायला सुरुवात झाली होती. अशात युपीमध्ये कारसेवाही सुरु करण्यात आली होती. यावेळी कारसेवकांनी बाबरीच्या दिशेने प्रवास सुरु केला होता आणि मोठा जमाव निर्माण झाला होता. त्यावेळी मुलायम यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. सुरक्षा दलाच्या या कारवाईत १६ कारसेवक शहीद झाले होते. तर शेकडो जखमी झाले. त्यानंतर मुलायम यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या कारवाईत २८ लोक मारले गेले. त्याचाच परिणाम म्हणजे मुलायमसिंह यांचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार सत्तेत आले होते.

दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मुलायम सिंह यांना किडनीच्या संसर्गासोबत रक्तदाबाचा त्रास वाढला होता, अखेर उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर मुलायम यांच्या निधनाची माहिती दिली. मुलायम यांचे पार्थिव सैफई येथे नेण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा