मुळशी तालुक्यातील माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या शाळेतील तब्बल पाच विद्यार्थ्यांनी त्यांच्या असामान्य कामगिरीने केवळ शाळेचाच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे. जिल्हा परिषद, पुणे आणि ‘आयुका’ (IUCAA) यांनी आयोजित केलेल्या एका खास स्पर्धेतून या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, ज्यामुळे ते आता अमेरिका आणि बंगळुरू येथील अनुक्रमे नासा (NASA) आणि इस्रो (ISRO) या जगप्रसिद्ध संशोधन संस्थांना भेट देणार आहेत.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आदित्य सचिन आहेर याची नासा, अमेरिका भेटीसाठी निवड झाली आहे. तर, श्रावणी अतुल पचांग, साक्षी संतोष गंडदोर आणि गौरी राजेश गवई यांची इस्रो, बंगळुरू भेटीसाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय, ऋग्वेद घोरपडे हा प्रतीक्षा यादीत (वेटिंग लिस्ट) असून, त्यालाही संधी मिळण्याची आशा आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. वैशाली वाळुंज, नवनाथ राणे, दिलीप चांदणे, रामदास वाव्हळ आणि शमीम शेख यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गट शिक्षणाधिकारी दत्तात्रय भालेराव, केंद्रप्रमुख सुरेश साबळे आणि मुख्याध्यापक संजय जगताप यांचेही मार्गदर्शन लाभले.
मुळशीच्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली असून, शासनाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानात करिअरच्या संधी निर्माण कराव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे. हे यश ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य संधी मिळाल्यास ते किती मोठी भरारी घेऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































