गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पवना धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे पिंपरी-चिंचवडमधील पवना नदीला पूर आला आहे. यामुळे शहरातील अनेक भागांत, विशेषतः नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून, महापालिकेने तातडीने ११२७ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. या सर्व नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून शाळा आणि महापालिकेच्या इमारतींमध्ये ठेवण्यात आले आहे.
महापालिकेचे पथक मंगळवारपासूनच पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतः मदत केंद्रांची पाहणी करून सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. चिंचवड परिसरात सर्वाधिक ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, बोपखेल आणि भाटनगरसारख्या भागांत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागले आहे.
या आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी शहरात आठ मदत केंद्रे उभारली गेली आहेत. या केंद्रांमध्ये पाणी, वीज आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत असून, महापालिका प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी अग्निशमन दलाची पथके आणि पीएमपीएमएलच्या बसेसही तैनात करण्यात आल्या आहेत. पाऊस सुरूच असल्याने, प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे आणि मदतीसाठी महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांकही जाहीर केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे










































