मूल मोठे होत असताना आपण अगदी प्रेमाने त्याला वाढवतो. त्याला हवं नको सगळं देतो. त्याला संस्कार आणि मूल्ये देताना एक नक्की लक्षात ठेवतो कि हे संस्कार आणि मूल्ये त्याला दैनंदिन आयुष्य जगताना उपयोगी पडावेत. परंतु आपण नक्की एक गोष्ट मूल वाढवताना लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे मूल स्वावलंबी बनवणं आपलं खरं ध्येय असायला हवं.
मूल मोठं होताना एक काळ असा असतो जेव्हा मूल त्याच्या गोष्टी करायला उत्सुक असतं. जसं कि, कपडे घालणं, अंघोळ करणे, जेवणे. आपण सुरवातीला नाही, नको म्हणून लाड करतो आणि नंतर तक्रार करतो कि मूल स्वावलंबनाचे धडे गिरवत नाही!
आपण मात्र एक गोष्ट विसरून जातो कि, जेव्हा आपण मुलाकडून स्वावलंबनाची अपेक्षा करतो तेव्हा आपण आपल्या वस्तू आपल्या हाताने घेतो का? आपण आपल्या कामासाठी इतरांवर अवलंबून तर राहत नाही ना? जेव्हा आपण त्यांना प्रत्येक गोष्ट हातात देतो तेव्हा त्यांना आपल्यावर अवलंबून राहण्याची सवय लागते. मुले मोठी होतात तसं एकच शिकतात, “आईने केल्याशिवाय करायचं नाही.” त्यांच्यापेक्षा आपल्याला नक्कीच चांगलं येत असतं. पण त्यांनी केल्याशिवाय त्यांना येणारही नसतं. हे करू देणं, मेहनत घेणं त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी तयार करतं.