सहा लाख प्रसादाचे लाडू -मोफत बससेवा, शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी

शिर्डी, २ जुलै २०२३ : या वर्षी गुरुपौर्णिमा ३ जून रोजी आहे. परंतु उत्सव आजपासून म्हणजेच २ जुलैपासून सुरू होईल. कोट्यावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री.साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी यंदा देश-विदेशातून सुमारे तीन ते चार लाख भाविक शिर्डीत येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काल शनिवारी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या आधीच, सुमारे साठ ते सत्तर हजार भाविकांनी बाबांचे दर्शन घेतले.

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी साई संस्थान प्रशासनाने भाविकांसाठी उत्सव काळात सहजरित्या प्रसन्न दर्शनासह निवास, भोजन प्रसादाची व्यवस्था केलीय. मागील वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डी येथे ३ लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. इतर वेळी दररोज ४० ते ५० हजार भाविक दर्शन घेतात. यंदा एक दिवस आधीच यात १५ हजार भाविकांची वाढ झालीय.

गुरुपौर्णिमा उत्सवाला शिर्डीत आजपासून सुरुवात होतेय. यंदा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्टॉलमध्ये वाढ करण्यात आलीय. भाविकांसाठी भक्त निवासात लॉकरची सुविधाही सुरू करण्यात आली असुन साईबाबांचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहील. साई मंदिर आणि परिसर सजवण्यात आला असून विद्युत रोषणाईही करण्यात आलीय. या वर्षी दर्शनरांगेत मोफत चहा, कॉफी, पाणी देण्यात येणार आहे तसेच शिर्डीत वाहतूक समस्या निर्माण होऊ नये म्हणुन जड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात येईल.

नाष्टा पाकिटे आणि लाडू प्रसाद, बुंदी प्रसाद पाकिटांचीही निर्मिती करण्यात आली असुन साई प्रसादालय भाविकांसाठी सज्ज झालंय. प्रसादालयात दोन लाख भाविक प्रसाद घेतील, या अंदाजाने प्रशासनाने नियोजन केेलय. पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी वॉटरप्रूफ मंडप, तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आलीय. विविध भक्त निवास आणि तात्पुरत्या मंडप व्यवस्थेतून २२ हजार भाविकांची निवास व्यवस्था केली जाईल.

मंदिर परिसराच्या बाहेर भक्त निवासांमध्ये, साई मंदिर लाडू प्रसाद विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. भाविकांसाठी ६ लाख लाडू प्रसाद पाकिटांची निर्मिती करण्यात आली असुन दर्शनरांगेत भाविकांसाठी ३ लाख बुंदी प्रसाद पाकिटांची निर्मिती केली गेलीय. साईंचे सहज दर्शन व्हावे साठी संस्थानचे चार हजार कर्मचारी तैनात असुन निवास व्यवस्थेची माहिती भाविकांना उपलब्ध व्हावी यासाठी रेल्वेस्टेशन, बसस्थानक, भक्त निवास येथे चौकशी केंद्रे तयार करण्यात आलीयत. साई भजनसंध्या व कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले. यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवापासून साईसेवक योजना ही पूर्ववत सुरू केली गेलीय. साईभक्तांसाठी साई मंदिर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भक्त निवासे आदी ठिकाणांहून २४ बसेस उत्सव काळात मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा