मुंबई : बेस्टच्या ताफ्यात आणखी १००० ‘ई- बाईक्स’ ची भर!

10

मुंबई, २ डिसेंबर २०२२: मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक सुखद, आरामदायी आणि किफायतशीर बनवण्यासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये ‘बेस्ट’कडून ‘ई- बाईक्स’ची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती. या अंतर्गत बेस्टने ७०० बाईक्स उपलब्ध करून दिल्या होत्या. या उपक्रमाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर आता बेस्टच्या ताफ्यात आणखी १००० ‘ई- बाईक्स’ची भर पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगराबरोबरच संपूर्ण मुंबईत डिसेंबर महिन्यापासून बेस्टची खास सेवा दिली जाणार आहे. डिसेंबर महिन्यात १८० बस स्थानकांवर १००० ‘ई- बाईक्स’ धावण्यासाठी सज्ज असतील. यामध्ये अंधेरी, विलेपार्ले, जुहू, सांताक्रुज, वांद्रे, माहीम आणि दादर या भागांचा समावेश असेल.

दरम्यान, ‘ई- बाईक्स’ची सेवा देणारा ‘बेस्ट’ परिवहन उपक्रम हा भारतातील पहिला सार्वजनिक उपक्रम ठरला आहे. तसेच या ‘ई- बाईक्स’ सेवेचा लाभ घेण्यासाठी बेस्ट बसचा पास या सेवेशी जोडण्यात आला असून, ही सुविधा घेण्यासाठी मुंबईकरांना स्पेशल ट्रॅव्हल पास काढावा लागेल. या पासमुळे ई-बाईक सेवा आणि बेस्ट बसचा प्रवास एकत्रितरीत्या करता येईल, असे बेस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वोगो, या सेल्फ ड्राईव्ह मोबिलिटी कंपनीच्या साहाय्याने ही सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेसाठी सुरुवातीचा दर २० रुपये असेल. तर पुढे प्रत्येकी किलोमीटरसाठी २३ रुपये दर आकारला जाईल. ही बाईक प्रति ताशी २५ किलोमीटरच्या वेगाने धावेल. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास कमीत कमी वेळेत पूर्ण होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा