मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला कोर्टानं सुनावली १० वर्षांची शिक्षा

इस्लामाबाद, २० नोव्हेंबर २०२०: मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टानं १० वर्षांची शिक्षा सुनावलीय. टेरर फंडिंगशी संबंधित दोन खटल्यांमध्ये कोर्टानं सईदला शिक्षा सुनावलीय. सईदसह जफर इक्बाल, याहया मुजाहिद आणि अब्दुल रहमान मक्की यांनाही शिक्षा सुनावण्यात आलीय.

जुलै २०१९ मध्ये हाफिज सईदला अटक करण्यात आली होती आणि आतापर्यंत त्याच्यावर चार खटल्यांमध्ये दोषारोप ठेवण्यात आले आहेत. सीटीडीत जमात-उद-दावाच्या नेत्यांविरूद्ध एकूण ४१ खटले दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी २४ जणांचा निर्णय घेण्यात आला आहे, तर उर्वरित एटीसी कोर्टात प्रलंबित आहेत. वृत्तानुसार, सईदला दहशतवादी वित्तपुरवठा, धनशोधन आणि बेकायदेशीर जमीन हडपण्याच्या आरोपाखाली खटले भरण्यात आले आहे.

ऑगस्टमध्ये अँटी टेररिझम कोर्टानं जमात-उद-दावाच्या तीन प्रमुख नेत्यांना आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या जवळच्यांना तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. लाहोरचे प्राध्यापक मलिक जफर इक्बाल आणि शेखपुराचे अब्दुल सलाम यांना १६-१६ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. दोघांनाही वेगवेगळ्या खटल्यांमध्ये १६-१६ वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

विशेष म्हणजे हाफिज सईद लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. तसेच पाकिस्तानमध्ये तो जमात-उद-दावा नावाची संस्था चालवतो. सईद हा २००८ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार आहे. भारत बऱ्याच काळापासून हाफिज सईदचा शोध घेत होता. अमेरिकेनं सईदच्या डोक्यावर दहा लाख डॉलर्स (सुमारे ७० कोटी) चं बक्षीस जाहीर केलं होतं.

इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस

भारताच्या आदेशानुसार इंटरपोल’नं २५ ऑगस्ट २००९ रोजी हाफिज सईदविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली पण तो पाकिस्तानात मुक्तपणे फिरताना दिसला. २०१७ च्या सुरूवातीस, पाकिस्तान सरकारनं जमात-उद-दावा विरोधात कारवाई सुरू केली. या दरम्यान, त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं. त्यानंतर सईदला नोव्हेंबर २०१७ मध्ये सोडण्यात आलं.

जुलै २०१८ मध्ये पाकिस्तानला एफएटीएफच्या ग्रे यादीवर टाकण्यात आलं. यानंतर हाफिज सईदला काऊंटर टेररिझम डिपार्टमेंट (सीटीडी) नं १७ जुलै २०१९ रोजी अटक केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा