मुंबईची बंगळुरूवर मात, ५ गडी राखून विजय

दुबई, २९ ऑक्टोंबर २०२०: सूर्यकुमार यादवने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने बंगळुरूवर ५ गडी राखून विजय मिळवला. बंगळुरूच्या संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात असतानाच विराटसह काही खेळाडूंनी क्रीडारसिकांची निराश केली. सामन्यात प्रथम फलंदाजी केल्यानंतर या संघाचं आव्हान पेलत मुंबईनं हा सामना खिशात टाकला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने १६४ धावांपर्यंत मजल मारली होती. देवदत्त पडीकलने दमदार अर्धशतक ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली होती. या आव्हानात्मक लक्षाचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत नाबाद ७९ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

क्विंटन डिकॉक अवघ्या १८ धावांवर बाद झाला. इशान किशनला चांगली सुरूवात मिळाली पण मोठा फटका खेळताना तो २५ धावांवर बाद झाला. कृणाल आणि हार्दिक पांड्यालाही प्रभावी खेळ करता आला नाही. एकिकडे संघाची ही अवस्था असतानाच दुसरीकडे सूर्यकुमार यादवनं मात्र खऱ्या अर्थानं संघाला विजयी टप्प्यावर आणलं. ४३ चेंडूंमध्ये त्यानं १० चौकार आणि ३ षटकारांची बरसात करत नाबाद ७९ धावा केल्या. बंगळुरूकडून युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराजने २-२ तर ख्रिस मॉरिसने १ बळी टिपला.

बंगळुरूचे सलामीवीर देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी दमदार सुरूवात केली. जोशुआ फिलिप २४ चेंडूत ३३ धावा काढून माघारी परतला. कर्णधार विराट कोहलीही ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात डीव्हिलियर्स (१५) झेलबाद झाला. पाठोपाठ शिवम दुबेही तंबूत परतला. पण खेळपट्टीवर स्थिरावलेल्या देवदत्त पडीकलने दमदार ७४ धावा केल्या. त्याने ४५ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकार खेचत ७४ धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर संघाने १६४पर्यंत मजल मारली. बुमराहने ३ तर बोल्ट, राहुल चहर आणि पोलार्डने १-१ बळी टिपला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा