मुंबईचा दिल्लीवर ९ विकेट्सने दणदणीत विजय

दुबई, १ नोव्हेंबर २०२०: सलामीवीर इशान किशनचं अर्धशतक आणि त्याला क्विंटन डी-कॉक व सूर्यकुमार यादव यांनी दिलेली भक्कम साथ या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी १११ धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे विजयी आव्हान १ विकेट गमावून ३४ चेंडूआधी पूर्ण केलं. इशान किशन मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. इशानने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नॉर्टजेने एकमेव विकेट घेतली. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे.

किशन आणि डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. सलामीची जोडी मुंबईला विजय मिळवून देणार असं वाटत असताना क्विंटन २६ धावांवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार मैदानात आला. सूर्यकुमारने इशानला चांगली साथ दिली. यानंतर इशानने सूर्यकुमारच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत इशान किशनने नाबाद ७२ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत किशनने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. इशान-सूर्यकुमार या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची नाबाद भागीदारी केली. सूर्यकुमार यादव १२ धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडले. मुंबईच्या आक्रमक गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सलामीवीर शिखर धवन सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने धवनचा झेल घेतला. यानंतर अजिंक्य रहाणेच्या जागेवर संधी मिळालेल्या पृथ्वी शॉ देखील अपयशी ठरला, बोल्टच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात पृथ्वी १० धावा काढून बाद झाला. दिल्लीने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून ११० धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक २५ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने २१ धावा केल्या. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर नॅथन कुल्टर नाईल आणि राहुल चहरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा