दुबई, ६ नोव्हेंबर २०२० : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी मात करत आयपीएलच्या १३ व्या मोसमातील अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मुंबईची अंतिम फेरीत पोहचण्याची ही सहावी वेळ ठरली. इशान किशन (५५), सूर्यकुमार यादव (५१) आणि हार्दिक पांड्या (३७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र, दिल्लीला निर्धारित २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून १४३ धावाच करता आल्या. दिल्लीकडून मार्कस स्टोयनिसने ६५ तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. डी कॉक-सूर्यकुमार यादव जोडीने चांगली भागीदारी केली. डी कॉक ४० धावांवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तर सूर्यकुमार यादव अर्धशतकानंतर लगेचच ५१ धावांवर माघारी परतला. कायरन पोलार्ड (०), कृणाल पांड्या (१३) देखील लवकर बाद झाले. त्यानंतर इशान किशन-हार्दिक पांड्या जोडीने तुफान फटकेबाजी करत मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. किशनने ३० चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. हार्दिकने १४ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. दिल्लीकडून रवीचंद्रन आश्विनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर एनरिच नोर्तजे आणि मार्कस स्टोयनिसने प्रत्येकी १ विकेट मिळवला.
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची निराशाजनक सुरुवात राहिली. दिल्लीने पहिले ३ विकेट्स शून्यावर गमावले. पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन तिघेही तगडे फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे दिल्लीची १.२ ओव्हरमध्ये ०-३ अशी परिस्थिती झाली. यानंतर श्रेयस अय्यर आणि मार्कस स्टोयनिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, जसप्रीत बुमराहने दिल्लीला चौथा झटका दिला. कर्णधार श्रेयस अय्यर १२ धावांवर बाद झाला. मुंबईने दिल्लीला ठराविक अंतराने झटके देण्याची मालिका सुरुच ठेवली. दिल्लीची धावसंख्या ४१ असताना कृणाल पंड्याने ऋषभ पंतला ३ धावांवर सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं.
यानंतर सहाव्या विकेटसाठी मार्क्स स्टोयनिस आणि अक्षर पटेलने ७१ धावांची भागीदारी केली. बुमराहने स्टोयनिसला ६५ धावांवर बाद केलं. स्टोयनिसने ४६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ६५ धावांची चांगली खेळी केली. डॅनियल सॅम्सला बुमराहने शून्यावर माघारी पाठवले. यानंतर फटकेबाजी करत असलेल्या अक्षर पटेलला कायरन पोलार्डने आपल्या बोलिंगवर राहुल चाहरच्या हाती झेल बाद केलं. अक्षरने ३३ चेंडूत २ फोर आणि ३ सिक्ससह ४२ धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. ट्रेन्ट बोल्टने २ विकेट्स घेत बुमराहला चांगली साथ दिली. तर कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी १ विकेट मिळवला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे