मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा कारागृहात मृत्यू

नाशिक: १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व कुख्यात दहशतवादी टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमन याचा शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मेमन सकाळी रोजच्याप्रमाणे साडे दहाच्या सुमारास आंघोळ करण्यासाठी बाहेर पडला होता. स्नानगृहाच्या परिसरामध्ये तो दात घासण्यासाठी थांबला होता. दात घासत असताना मेमन अचानक जमिनीवर कोसळला. ही घटना घडताच त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला होता.

प्राथमिक अंदाजानुसार त्याचा मृत्यू हदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असे सांगण्यात आले आहे. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळ्याला पाठवण्यात आला आहे. १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट मधील मुख्य आरोपी टायगर मेमन याचा युसुफ मेमन हा भाऊ होता. टायगरला याआधी फाशीची शिक्षा झाली असून सध्या तो फरार आहे. टायगर मेमन हा सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा केला जात आहे.

टायगर मेमनचा दुसरा भाऊ इसाक मेमन हा देखील नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. हे दोघेही २०१८ पासून या कारागृहात शिक्षा भोगत आहे. युसूफवर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आणि कटात सहभाग घेतल्याचा आरोप आहे. बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी आपला फ्लॅट दिल्याचा या दोघांवरही आरोप होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा