मुंबई, दि.८ मे २०२०: ठाकरे सरकारकडून मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.त्यामुळे मुंबईचे नवीन आयुक्त इकबाल चहल यांची वर्णी लावली आहे. प्रवीण परदेशी आता नगर विकास विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
त्याचप्रमाणे मुंबई महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता ठाण्याचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय प्रविण परदेशी यांनी घेतलेले अनेक निर्णय हे वादात आणणारे होते. त्यांच्या कारभाराबाबत अनेक मंत्र्यांकडून तक्रारी देखील येऊ लागल्या होत्या.
२०१९ मध्ये प्रविण परदेशी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे. परदेशी यांनी आपल्या२९ वर्षांच्या कार्यकाळात लातूर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: