चेन्नई सुपर किंग्ज कडून मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव, ऋतुराज ठरला सामनावीर

पुणे, 20 सप्टेंबर 2021: कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2021) 14 वे पर्व कालपासून पुन्हा सुरु झाले. पहिलाच सामना आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघादरम्यान खेळविण्यात आला. भारतात पार पडलेल्या पूर्वाधातील पराभवाचा वचपा काढत चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला दुबईच्या मैदानावर 20 धावांनी मात दिली आहे. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध 218 धावा करूनही सामना जिंकता आला नाही. त्या सामन्यात मुंबईने हारला विजयात बदललं होतं. मात्र, काल चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.

या सामन्या चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज अशी नाबाद 88 धावांची खेळी खेळत चेन्नईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर 20 षटकात 6 बाद 156 धावा केल्या. चेन्नईचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद 88 धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मुंबईकडून सौरभ तिवारीने नाबाद 50 धावांची खेळी केली, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत 12 गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे.

मुंबईच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी

मुंबईला 157 धावांचे आव्हान होते. जे त्यांच्यासारख्या दिग्गज संघासाठी तितके अधिक नव्हते. पण कर्णधार रोहित आणि अष्टपैलू हार्दीक पंड्याच्या अनुपस्थितीत सर्वच फलंदाज गारद पडले. मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा