मुंबई इंडियन्सनं पाचव्यांदा जिंकलं विजेतेपद… रोहितचं दमदार अर्धशतक

18

शारजा, ११ नोव्हेंबर २०२०: हिटमॅन रोहित शर्माच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर आणि ईशान किशनच्या नाबाद ३३ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेट्सनं शानदार विजय मिळवला. मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

दिल्लीच्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं षटकारासह झोकात सुरुवात केली. रोहितनं पहिल्याच षटकात षटकार लगावला आणि संघाला धडाक्यात सुरुवात करून दिली. त्यानंतर रबाडाच्या पहिल्याच षटकात मुंबईने १८ धावांची वसुली करत आपले इरादे स्पष्ट केले. मुंबईनं पहिल्या चार षटकांमध्ये जवळपास १० च्या धावगतीनं धावा जमवल्या होत्या. पण, चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईला पहिला धक्का बसला. मार्कस स्टॉइनिसनं आपल्या पहिल्याच चेंडूवर मुंबईच्या क्विंटन डीकॉकला बाद केलं. डीकॉकने यावेळी १२ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २० धावा केल्या.

क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्मानं सुर्यकुमार यादवच्या साथीनं डाव पुढं नेला. रोहितसोबत चांगली भागीदारी असतानाच सूर्यकुमार यादव धावचीत झाला. रोहित हळूच फटका खेळत एकेरी धाव घेण्यासाठी धावला पण रोहित-सूर्यकुमार यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारनं आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं. सूर्यकुमारनं २० चेंडूत १९ धावा केल्या. रोहितनं मात्र सूर्यकुमारच्या विकेटचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. त्यानं ५१ चेंडूत दमदार ६८ धावा कुटल्या. तो बाद झाल्यावर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीनं विजयाची औपचारिकता पूर्ण केली. मुंबईचं हे पाचवं आयपीएल विजेतेपद ठरलं.

मुंबईकर श्रेयस अय्यरनं आजच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मुंबई इंडियन्सपुढं १५७ धावांचं आव्हान ठेवता आलं होतं. आयपीएलच्या आजच्या अंतिम फेरीत दिल्लीची ३ बाद २२ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर अय्यर आणि पंत या दोघांनी अर्धशतकं साकारत मुंबईच्या गोलंदाजीवरच जोरदार हल्ला चढवला. या दोघांच्या दमदार फटकेबाजीमुळेच दिल्लीला मुंबईपुढं हे सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. श्रेयस अय्यरनं यावेळी नाबाद ६५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा