मुंबई: जनता कर्फ्यू असल्याने आज मुंबईतील लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. केवळ ६० टक्केच लोकल आज धावत आहेत. ही सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंतच असेल. देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई लोकललाही ब्रेक लागणार आहे. रात्री १२ नंतर लोकलसेवा पूर्णपणे बंद करण्यात येईल.
३१ मार्चपर्यंत ही सेवा स्थगित राहील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबईप्रमाणे कोलकातामधील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने वारंवार सुचना करुनही रेल्वेमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या प्रमाणामुळे कोरोनाची लागण होण्याची वाढती शक्यता पाहता अखेर प्रशासनाला मुंबई लोकल थांबवण्याचा हा निर्णय घ्यावा लागला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी लोकल बंद करणे हे शेवटचे पाऊल होते. त्याबाबत गेले काही दिवस चाचपणीही सुरू होती. कालच कोकण विभागीय आयक्तांनी महत्त्वाचा निर्णयही जाहीर केला होता. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी-अधिकारी तसेच तातडीचे उपचार आवश्यक असणारी व्यक्ती सोडून कोणालाही रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही, असे शिवाजी दौंड यांनी स्पष्ट केले होते. या निर्णयाची आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या निर्णयानंतर आता मुंबईतील लोकलसेवाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने लोकलला खऱ्या अर्थाने ब्रेक लागणार आहे.
मुंबईची लोकल सेवा जवळपास ३१ मार्चपर्यंच बंद राहणार आहे. तर, मालवाहतूक काही महत्त्वाच्या कारणांमुळे सुरु ठेवण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला प्रवासासाठी निघालेले सर्व प्रवासी इच्छित स्थळी पोहोचतील याची दखलही रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात येत आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या चारही मार्गांवरील लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.