मुंबई, १९ ऑक्टोंबर २०२०: मुंबईकरांसाठी उपनगरीय लोकल सोबतच मेट्रो ही प्रवासाचे प्रमुख साधन आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून या सेवांना ब्रेक लागला होता. अनलॉक काळात मुंबईतील तिन्ही मार्गावर विशेष लोकल धावत असल्या तरी नियमित लोकल सेवा मात्र अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. पण मुंबई मेट्रो अखेर आजपासून पुन्हा रुळावर आली आहे. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय.
वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील मेट्रो सोमवारपासून सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत धावेल. यादरम्यान मेट्रोच्या रोज २०० फेऱ्या होतील. गर्दीच्या वेळी दर साडेसहा मिनिटांनी, तर गर्दी नसलेल्या वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो सेवा असेल. प्रत्येक फेरीत ३०० प्रवासी प्रवास करू शकतील. मात्र येथेही मास्कसह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे प्रवाशांसाठी बंधनकारक असल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या मेट्रोच्या ५० टक्केच फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. गरज भासली तर त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी नियम
• मेट्रोचा प्रवास करताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे.
• मेट्रो प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशाला आपल्या मोबाईलमध्ये ‘आरोग्यसेतू’ अॅप डाऊनलोड करणं अनिवार्य आहे.
• स्थानकात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर गरजेचा आहे.
• संसर्ग टाळण्यासाठी दर दोन तासांनी स्थानकांवरील प्रवाशांशी संपर्क येणारी सर्व ठिकाणं निर्जंतुक केली जाणार आहेत.
• तसेच प्रत्येक फेरीनंतर मेट्रोच्या डब्यांचेही निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.
• मेट्रोमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रिनिंग केले जाईल.
• मानवी संपर्क टाळण्यासाठी आता प्लास्टिक टोकन ऐवजी कागदी तिकीट आणि मोबाईल तिकीटाचा पर्याय देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे