मुंबई – नाशिक महामार्ग विस्कळीत तर कसारा घाटात कोसळली दरड

ठाणे, ५ ऑगस्ट २०२०: ठाणे जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरात सोमवार पासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती. मात्र या मुसळधार पावसाला आता अतिवृष्टीचे वळण आले आहे. ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र काल रात्रीपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अत्यावश्यक सेवांसाठी सोडल्या जाणऱ्या रेल्वे सुद्धा ४० ते ४५ मिनिटे उशिराने धावत होत्या. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे

कसारा घाटात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने मातीचे ढिगारे व झाडं पडली आहेत. वाहनचालकांना पडलेल्या झाडांतून वाट काढावी लागत आहे. यामुळे या महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला तर मुंबई नाशिक महामार्ग काही प्रमाणात विस्कळीत होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहतूक तुरळक प्रमाणात ठप्प झाली.

कसारा घाटाकडे जाणाऱ्या खोपोली आणि शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रासह परिसरात मोठया प्रमाणात पावसाने जोर पकडला आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक प्रमुख ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा