बँक केवायसीच्या नावाखाली, लाखोंची फसवणूक करणाऱ्याच्या मुंबई पोलिसांनी झारखंडमध्ये आवळल्या मुसक्या

मुंबई, ७ जुलै २०२३ : बँकेची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली, लाखोंची फसवणूक करणाऱ्या ठगाच्या बोरीवली पोलिसांनी अखेर झारखंडमधून मुसक्या आवळल्या आहेत. हुसेन अजगर अली अन्सारी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बोरिवली येथील रहिवासी असलेल्या एका तक्रारदाराने आठ फेब्रुवारी रोजी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी झारखंडमध्ये असल्याचे समजले.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पोलिसांनी एक पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने झारखंडमध्ये गाव बरडदुब्बा तहसील पालाजोरी देवघर झारखंड येथे छापा टाकला. आरोपी हुसेन अजगर अली अन्सारी हा १४ मोबाईल घेऊन बसला होता. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जात होता. परंतु पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांनी आरोपी हुसेनला पाठलाग करुन अटक केली.

आरोपीकडून १४ मोबाईल आणि अनेक सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या खात्यातून आरोपींनी ट्रान्सफर केलेल्या दोन लाख रुपयांपैकी एक लाख रुपये आयसीआयसीआय बँकेच्या कोलकाता शाखेत गोठवण्यात आले आहेत. या फसवणुकीत आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि त्यांनी आतापर्यंत कोनाकोणाची फसवणूक केली आहे, याबाबत बोरीवली पोलीस आरोपींकडे तपस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा