मुंबई, पुणे, अमरावती येथील बलात्काराच्या प्रकरणांनी महाराष्ट्र सुन्न झालेला असतानाच काही तासांतच आता ठाणे जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरून गेला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात सतत बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यात साकीनाका घटना तर हादरवून सोडणारी आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता ठाणे जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरून गेला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका नराधमाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
संबंधित घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शादरुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे. तसेच या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमके घडले काय
या धक्कादायक घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, उल्हासनगर स्थानकास लागून असलेल्या स्कायवॉकवर ही पीडित अल्पवयीन मुलगी उभी होती. ही मुलगी शिर्डीहून कल्याण येथे एका खासगी बसने आली होती. स्कायवॉकवर तिला तिचे दोन मित्र भेटले. एक तरुण तिच्या जवळ आला. त्याच्या हातात हातोडा होता. या हातोड्याचा वापर करत त्याने तिच्या मित्रांना धमकावले. त्यानंतर ते मित्र पळून गेले. त्यानंतर त्या तरुणाने तिला जबरदस्ती एका निर्जन स्थळी नेले. त्या ठिकाणी त्याने मुलीला बेदम मारहाण केली. नंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलीला घटनास्थळी तसेच सोडले आणि तो पळून गेला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे