मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पाला अजित पवारांचा विरोध

पुणे: सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून फडणवीस सरकारने मान्यता दिलेल्या, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. ‘हायपर लूप हा प्रकल्प जगात कोठेही झालेला नाही. आधी जगात हा प्रकल्प होऊ दे. पुणे-मुंबई या मार्गासाठी आपल्यावर प्रयोग कशाला? हा प्रकल्प परवडणारा नाही,’ असे वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे ते मुंबई हायपर लूप प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा करार केला होता़ हा प्रवास ताशी १,२२0 किलोमीटर असेल तशी त्याची रचना होती़ हायपरलूप सुरू झाल्यानंतर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते वाकड (पुणे) दरम्यानचे ११७.५ किलोमीटरचे अंतर २३ मिनिटांत पार करता येईल, असे त्यांनी सांगितले होते़ ७0 हजार कोटींच्या प्रकल्पासाठी दुबईतील कंपनी गुंतवणुकीस तयार झाली होती़.

‘पुणे-मुंबई घाटमार्गातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी बोगदा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा बोगदा उपलब्ध झाल्यावर वाहतूक सुरळीत होऊ शकणार आहे. त्यामुळे हायपर लूप प्रकल्पाबाबत विचार करावा लागणार आहे,’ असेही पवार म्हणाले.प्रथम जगात तो किमान दहा किलोमीटर तरी अस्तित्वात येऊ द्या. नंतर बघू, असे पवार यांनी सांगितले़ मी या प्रकल्पाला नाही म्हटले नाही, पण ‘हायपर लूप’ची ट्रायल घ्यायची आपली क्षमता नाही.

हायपर लूपचे तीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले होते. पहिला मार्ग हा पुणे ते नवी मुंबई, ट्रान्सहार्बर लिंक, शिवडी, दादर असा आहे. दुसरा मार्ग पुणे ने नवी मुंबई, वाशी, दादर असा प्रस्तावित केला आहे. तिसरा मार्ग पुणे ते वाशी, सांताक्रूज, कुर्ला, दादर असा सुचविण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा